Pages

चिमणराव




*विनोदबुद्धीची उपजत देणगी लाभलेले कथाकार*

चिं. वि. जोशी
साहित्यिक 【चिमणराव】

📊📊📊📊📊📊📊📊📊📊

         👇
 👇 👇
 👇

(१९ जानेवारी १८९२
 ते २१ नोव्हेंबर १९६३)

विनोदबुद्धीची उपजत देणगी लाभलेले कथाकार, पाली भाषेचे गाढे अभ्यासक.

सर्वसामान्य वाचकांना समजेल, रुचेल अशा स्वरूपाचं हलकंफुलकं विनोदी लेखन करून मराठी साहित्यात विनोदाची नवी परंपरा निर्माण करणारे विनोदकार, विनोदी कथाकार म्हणून चिंतामण विनायक ऊर्फ चि. वि. जोशी परिचित आहेत. चिंतामणराव कोल्हटकर, आणि राम गणेश गडकरी यांच्या परंपरेत शोभून दिसणारा कोटीबाज विनोद, मानवी स्वभावातली विसंगती सूक्ष्मपणे हेरण्याची वृत्ती, सोपी भाषा, सर्वसामान्यांच्या आयुष्यात हरघडी दिसेल अशी हास्यास्पदता सहजरीतीने दाखवून देण्याची हातोटी यामुळे जोशी यांचा विनोद वेगळा ठरला. तत्कालीन महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय समाज व संस्कृती यांच्या मार्मिक निरीक्षणातून निर्माण झालेल्या अस्सल विनोदाची देणगी चिं. वि. जोशी यांनी मराठी साहित्याला दिली. त्यांचा मानसपुत्र 'चिमणराव' हा मराठी साहित्यात अमर झाला आहे. पाली भाषेचे गाढे अभ्यासक म्हणूनही त्यांचा लौकिक होता. मराठी, हिंदी, पाली भाषांसोबतच चिं. वि. जोशी यांचं गुजराती भाषेवरही प्रभुत्व होतं.

जोशी यांचा जन्म पुण्यातला. त्यांचं दुसरीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण हुजूरपागेतील प्रॅक्टीसिंग स्कूलमध्ये झालं. त्यानंतर तिसरीपासून मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण त्यांनी नूतन मराठी विद्यालयात पूर्ण केलं. फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी १९१३ साली तत्त्वज्ञानाची पदवी संपादन केली. दोन वर्षांनंतर मुंबई विद्यापीठातून त्यांनी पाली व इंग्रजी साहित्यातील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर लगेच त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, नेटिव्ह इन्स्टिट्युशन आणि सेंट जॉन्स स्कूल या तीन शाळांत पाली भाषा शिकवण्याचं काम केलं. पुढे अमरावती आणि मग रत्नागिरी इथेही त्यांनी शिक्षक म्हणून काही काळ काम केलं. १९२० साली बडोदा संस्थानातील एका महाविद्यालयात त्यांची पाली, इंग्रजी आणि मराठीचे अध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यांची इतिहास संशोधनातील गती लक्षात घेऊन बडोदा संस्थानच्या पुरातत्त्व खात्याचे संचालक म्हणून काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. निवृत्तीपर्यंत ते बडोद्यातच वास्तव्याला होते. त्यानंतर ते पुन्हा पुण्यात स्थायिक झाले.

जोशी यांची ओळख मराठी साहित्यविश्वात विनोदी साहित्यिक अशी असली तरी त्यांनी इतर अनेक विषयांवर लेखन केलं. त्यांनी चरित्रं लिहिली, मुलांसाठी पुस्तकं लिहिली, ऐतिहासिक संशोधनात्मक लिखाण केलं. पाली भाषेवरील त्यांचं संशोधनात्मक काम आजही अभ्यासलं जातं. जोशी यांच्या इतक्या विविध विषयांत संचार करण्याला बऱ्याच प्रमाणात त्यांचे वडील कारणीभूत होते. त्यांचे वडील म्हणजे 'सुधारक' या पत्राचे संपादक विनायक रामचंद्र जोशी. या पत्रावर पुण्यातल्या तेव्हाच्या सनातनी लोकांचा रोष असला, तरी सुधारकी विचारांच्या विद्वानांचा पाठिंबाही होता. त्यावेळी दिग्गज मंडळी 'सुधारक'च्या कार्यालयात जमून सामाजिक प्रश्नांवर अभ्यासू चर्चा करायची. त्यांच्या चर्चांमध्ये सहभागी होण्याची संधी चिं. वि. जोशी यांना मिळायची. या चर्चांचे संस्कार त्यांच्यावर झाले. त्यांच्या लिखाणातून ते पुढे उमटत गेले.

bori_babhali_cv_joshi.jpg
चिं. वि. जोशी यांच्या साहित्यिक लिखाणाला प्रारंभ वा. गो. आपटे यांच्या 'आनंद' मासिकातील कथेने झाला. यात त्यांनी विनोदी कथांसोबतच 'काकूंचे देव' यासारख्या भावनात्मक कथाही लिहिल्या. भोळेपणाचा आव आणून साळसूदपणे दुसऱ्याला बारीक चिमटे घेण्याची जोशी यांची कला 'विविधवृत्त' वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या पत्रांमधूनही आढळते. विनोदी लेख वा कथा लिहिणारे जोशी गंभीर मुद्द्यांवरील मतप्रदर्शनासाठीही प्रसिद्ध होते. तत्कालीन सामाजिक समस्यांवरील त्यांचे अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध आहेत. फाशीच्या शिक्षेच्या अनिष्टतेबद्दल मासिक 'मनोरंजन'मध्ये आणि अस्पृश्यतेबद्दल 'उद्यान' या मासिकात लेख लिहून त्यांनी त्याविरुद्ध लोकांना विचारप्रवृत्त केलं होतं. 'पूना मेल' या दैनिकात त्यांनी हिंदू-मुसलमान सौहार्दावरही काही लेख लिहिले होते.

पाली भाषेचे गाढे अभ्यासक असलेल्या जोशी यांचा प्राचीन बुद्धधर्म व तत्कालीन समाजाचाही अभ्यास होता. त्यावर आधारित त्यांनी केलेलं लेखन आजही संशोधकांना मार्गदर्शनपर ठरतं. त्यांनी 'मॅन्युअल ऑफ पाली', 'जातकातील निवडक गोष्टी', 'शाक्यमुनी गौतम', 'बुद्ध संप्रदाय व शिकवण', 'अडीच हजार वर्षांपूर्वीचा समाज', 'इंग्रजी शिष्टाचार', 'संशयाचे जाळे' इत्यादी पुस्तकं त्यांच्या संशोधनपर अभ्यासाची ओळख पटवून देतात.

जोशी यांच्या सर्वच लेखनामागे त्यांची जागरूक निरीक्षणवृत्ती दिसते. त्यांचं बरचंसं लिखाण प्रत्यक्ष घटना व लोकांवरील उपहासात्मक प्रकारचं लिखाण आहे. तो काळ, ते प्रसंग, त्या जागा, लोकांचे स्वभाव, वागण्या-बोलण्याच्या लकबी हेरून ते कथाप्रसंग खुलवायचे. त्यांच्या विनोदाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अतिशयोक्तीचा वापर व बौद्धिक कोटीबाजपणा करणं टाळलं. सामान्य लोकांच्या स्वभावातील विसंगतीवर हलत-खेळत ताशेरे ओढण्याकडे त्यांचा जास्त कल होता. त्यांचा विनोद गडाबडा लोळायला लावत नाही तर तो खुसखुशीत आहे. एकीकडे तो हसवणारा तर दुसरीकडे तो डोळे पाणावणाराही आहे. वाचक त्याच्याशी सहजपणे जुळवून घेतात. जोशी यांनी विनोदासाठी अश्लीलतेचाही आधार कधीच घेतला नाही. मुळातच त्यांचा अशा गोष्टींना विरोध आणि मनात तिटकारा होता.

charhat_joshi.jpg
चि. वि. जोशी अर्थातच प्रचंड नावाजले गेले ते त्यांच्या चिमणरावांसाठी. मराठी साहित्यातील एक अफलातून व्यक्तिरेखा म्हणून चिमणराव प्रसिद्ध आहे. त्यावर आधारित चित्रपट आणि दूरदर्शन मालिका यांनी मराठी माणसांच्या मनात घरं केलं. 'चिमणराव' व 'गुंड्याभाऊ' या आपल्या मानसपुत्र जोडगोळीच्या माध्यमातून त्यांनी मध्यमवर्गीय माणसाचं जगणं, त्याची स्वप्नं, त्याच्या आयुष्यातील सुख-दुःखं, त्याच्या मर्यादा यांचं चित्रण केलं. चिमणराव व जोशी यांच्याबद्दल बोलताना द. मा. मिरासदार सांगतात, ''चिं. वि. जोशी यांच्या विनोदात शाब्दिक कोट्या कमी आढळतात. त्यांचं वैशिष्ट्य आहे स्वभावनिष्ठ विनोद. त्याचे अनेक हास्यकारक नमुने आहेत. पण त्याचबरोबर ते मूळ अनुभवातली विसंगती आणि हास्यकारकता शोधतात आणि विनोदाची निर्मिती करतात. त्यांचा चिमणराव हा स्वतःमधीलच विसंगती प्रकट करतो आणि स्वतःलाच हास्याचा विषय बनवतो. त्यांचा विनोद जीवनातील वास्तवतेपासून दूर जात नाही. स्वतःलाच हास्याचा विषय बनवणं, हा अत्यंत श्रेष्ठ सुसंस्कृत विनोदाचा नमुना म्हटला पाहिजे.'
जोशी यांचा विनोदाचा बाज वाचकांनाही भावलेला आहे. त्याची साक्ष म्हणजे आजही त्यांच्या पुस्तकांना वाचकांची मागणी आहे. त्यांच्या विनोदाला काळाची मर्यादा नव्हती हे याने सिद्ध होतं. 'चिमणरावाचे चऱ्हाट', 'आणखी चिमणराव', 'तिसऱ्यांदा चिमणराव', 'चौथे चिमणराव', 'गुंड्याभाऊ', 'मोरू आणि मैना', 'विनोद चिंतामणी', 'वायफळाचा मळा', 'एरंडाचे गुऱ्हाळ', 'ओसाडवाडीचे देव', 'ना मारो पिचकारी', 'घरबशे पळपुटे', 'पाल्हाळ', 'मेषपात्रे', 'रहाटगाडगे', 'लंकावैभव', 'हापूस पायरी', 'संचार', 'बोरीबाभळी', 'स्टेशनमास्तर', 'आरसा', 'आमचा पण गाव', 'सोळा आणे' इत्यादी पुस्तकं त्यांच्या खुमासदार विनोदाचा बाज सांगणारी आहेत.



  🥀🌼💠■■💠🌼🥀
📊📊📊📊📊📊📊📊📊📊
     
  ●█║▌│║║█║█║▌║║█║