Pages

राग





 *विद्यार्थी विकास*

 👇
 👇
 👇 👇

*राग वाईट असतो पण राग व्यक्त करणं चांगलंच असतं*

राग व्यक्त करण्यानं एक नाही, दोन नाही तर अनेक प्रकारचे फायदे होतात.

         राग येत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. रोज आपल्याला कसलातरी राग येत असतो. कधी एखाद्या व्यक्तीचा, कधी एखाद्या घटनेचा, कधी परिस्थितीचा नाहीच कसला तर कधी स्वत:चाच राग येतो.
पण राग येणं आणि तो व्यक्त करणं हे काही चांगल्या व्यक्तीचं लक्षण नाही. म्हणून मग आतून कितीही राग आलेला असला तरी वरवर आपल्याला कसलाच राग येत नाही असं किमान भासवलं तरी जातं.

*पण याचा परिणाम काय होतो ?*

उत्तर सोपं आहे ना, आपण एक चांगली व्यक्ती म्हणून ओळखले जातो. पण हे वाटणं वरवरचंच असतं. कारण आपल्या मनात राग भरलेला असतो. तो आपण व्यक्त करत नाही. तो दाबून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. पण ही प्रक्रियाच आपल्यावर आतून खूप नकारात्मक परिणाम करते. वरवर राग न येणारे, शांत दिसणारे आपण आतून हललेलो असतो, डिस्टर्ब झालेलो असतो.
यावर उपाय एकच. राग आला तो लगेच आणि वेळेत व्यक्त करा. राग व्यक्त करणं हा स्वत:ला, इतरांना आणि नातेसंबंधांना जपण्याचा उत्तम मार्ग आहे.

अमेरिका आणि रशियामधील मानसशास्त्रज्ञांनी रागावर केलेल्या ताज्या संशोधनाचा अहवाल सांगतो की राग दाबणं हे वाईट असून राग व्यक्त करणं हे चांगलं असतं म्ह्णून राग व्यक्त करा. राग व्यक्त करण्यानं एक नाही, दोन नाही तर अनेक प्रकारचे फायदे होतात.

*राग व्यक्त करण्याचे फायदे*

*1)* राग ही वाईट भावना आहे असं आपण काय पूर्ण समाजानंच ठरवून टाकलं आहे. म्हणून तर मला खूप राग येतो म्हणून मी अमूक खडा अंगावर घालतो किंवा अमूक तमूक स्तोत्र किंवा पोथी वाचतो. पण राग याविषयावर काम करणारे शास्त्रज्ञ सांगतात की हे सर्व उपाय करण्यापेक्षा राग व्यक्त करणं हेच जास्त चांगलं असतं. यामुळे इतर नकारात्मक क्रिया करण्यास चालना मिळत नाही. अनेकदा राग मनातल्या मनात धुमसत ठेवला तर मग खूप खाण्याची इच्छा होते, अस्वस्थ वाटतं, रागाच्या भावनेने मनस्ताप वाढतो, संताप वाढतो. हे होवू नये म्हणून राग आला तर तो व्यक्त करून टाकावा.

*2)* राग व्यक्त केल्यानं आपण आपल्याला चांगल्या प्रकारे शोधू शकतो. विचारी लोकं राग व्यक्त करत नाही असं म्हटलं जातं. पण राग व्यक्त न करण्यामुळे आपलंच मानसिक आरोग्य धोक्यात येतं. अमेरिकन आणि रशियन मानसशास्त्रज्ञांच्या मते राग व्यक्त केल्यानं आपल्याला आपल्याच चुका सापडतात. आपण का संतापलो होतो? काय करायला हवं होतं? हे सर्व आपल्याला राग व्यक्त होवून गेल्यानंतर लक्षात येतं. त्यामुळे पुढच्या वेळेस तशा परिस्थितीत वागताना आधी झालेल्या चुका होत नाही.

*3)* कोणतंही काम करण्यासाठी प्रेरणेची गरज असते. ही प्रेरणा राग ही भावनाही देवू शकते पण कधी तर राग व्यक्त केल्यानंतर. स्वत:वरच राग व्यक्त केला तर हातातून आतापर्यंत जे काम होत नव्हतं ते होण्यास प्रेरणा मिळते. आपण काम होण्यासाठी अधिक हात पाय हलवतो, डोकं चालवतो, प्रयत्न करतो. तसेच इतरांकडून व्यवस्थित काम होत नसेल तरीही आपल्याला राग येतो. अशावेळेस त्या व्यक्तींचा आलेला राग कारणासाह व्यक्त करावा. म्हणजे समोरच्याला त्याच्या चुका कळतात आणि तोही वेगानं कामाला लागतो. अशा प्रकारे राग व्यक्त होणं हे एका प्रेरणेसारखं काम करतं.

*4)* मनात खूप राग भरून राहिला तर त्याचं पर्यावसन हे हिंसेत होतं. वेळीच राग व्यक्त न झाल्यानं थोडा थोडा राग मनात साचत राहातो. आणि मग एखाद्या दिवशी त्या रागाचा स्फोट होतो. हा स्फोट खूपदा मारण्याच्या रूपातच होतो. त्यामुळे राग आल्याक्षणी व्यक्त केला तर कोणा एका विशिष्ट व्यक्तीबद्दलचा द्वेष मनात साठून राहात नाही.

*5)* रागामुळे नकारात्मकता वाढते हे विधान रागाबद्दल नेहेमी काढलं जातं. पण ते अपूर्ण आहे. राग वाईट असतो हे खरं पण राग व्यक्त करणं हे चांगलं असतं. राग व्यक्त केल्यामुळे सकारात्मकता वाढते. परिस्थितीकडे, व्यक्तीकडे पाहाण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. परिस्थितीविषयी, व्यक्तीविषयी राग जर मनात साठूनच राहिला तर दृष्टिकोन कलुषित होतो, नकारात्मक होतो. त्याउलट जर राग वेळीच व्यक्त झाला तर सकारात्मकता वाढते. ती व्यक्ती, ती परिस्थिती नकोशी वाटत नाही.

*6)* एखाद्या व्यक्तीवर चिडल्यानं , रागावल्यानं म्हणे ती व्यक्ती दुखावते आणि दुरावतेही. पण हे खरं नाही उलट आपण एखाद्या व्यक्तीवरचा राग व्यक्त न करताच मनात साठवत राहिलो तर पुढे पुढे त्या वक्तीच्या छोट्या छोट्या गोष्टींचाही राग येतो.आणि आपण त्या व्यक्तीपासून दुरावत जातो. त्यापेक्षा राग वेळीच व्यक्त झाल्यानं रागाचं स्वरूप तीव राहात नाही. त्यामुळे राग व्यक्तही होतो आणि व्यक्ती जास्त दुखावली जात नाही. नातेसंबंध उलट राग व्यक्त केल्यानं द्ढ होत जातात. नात्यात राग साचवल्याचा कडवटपणा राहात नाही. नाती पारदर्शक होतात, मजबूत होतात.

*7)* रागाचा परिणाम आरोग्यावर होतो. हे खरं आहे. पण कधी? तर राग साठवल्यानं शारीरिक आणि मानसिक आरोग्य खराब होतं. राग व्यक्त करणं म्हणजे विरेचन आहे. कोणतीही वाईट गोष्ट शरीराबाहेर टाकली गेली तर शरीरास छान वाटतं, हलकं फुलकं वाटतं. तसंच रागाचंही आहे. राग व्यक्त केल्यानं मन शांत राहातं. राग साठवल्याचा मोठा परिणाम झोपेवर तसेच पचनावर आणि चयापचय क्रियेवर होतो. डोकं ठणठणतं. रक्तदाब वाढतो. तसेच त्वचेच आजारही राग साठवल्यानं होवू शकतात. या सर्वांपासून स्वत:ला वाचवायचं असेल तर राग व्यक्त करणं जास्त चांगलं.


            ✏ *संकलन*
           *नंदकिशोर फुटाणे