Pages

मेजर ध्यानचंद




कोण होते मेजर ध्यानचंद?*_

भारतीय हॉकीतील नव्हे तर हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही मेजर ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते. हॉकीतील जादूगार अशीच त्यांची जगभरात ओळख आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त भारतात 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. हॉकीतील त्यांचे योगदान व देशाप्रतीचा असणारा अभिमान यामुळे त्यांना आजही आदराचे स्थान आहे. अशा या महान खेळाडू विषयी आज जाणून घेऊयात...

👉 _*मेजर ध्यानचंद यांचा जन्म*_

मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 ला अलाहाबादमध्ये झाला. वडील सामेश्वरसिंग  सैन्यात असल्यामुळं कुटुंबाचं स्थलांतरण कायम ठरलेलं. त्यामुळे ध्यानसिंग यांना जास्त शिकता आलं नाही. त्यांचं 6 वी पर्यंत शिक्षण झालं. वयाच्या 16 व्या वर्षी ते सैन्यात भरती झाले. पैलवान बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ध्यानसिंग यांना सुरूवातीच्या काळात हॉकीबद्दल फारसं आकर्षण नव्हतं. पण सैन्यदलात रंगणाऱ्या हॉकीच्या सामन्यांमुळे त्यांची हॉकीशी ओळख झाली.

👉 _*ध्यानसिंग ते ध्यानचंद*_

तत्कालिन मेजर बल्ले सिंग तोमर यांनी ध्यानसिंगच्या हातात हॉकी स्टिक सोपवली आणि याच हॉकी स्टिकनं पुढे ध्यानसिंग यांना ध्यानचंद बनवलं. काम संपल्यानंतर ध्यानसिंग चंद्राच्या उजेडात हॉकीची प्रॅक्टिस करत. याच साधनेमुळं लोकं त्यांना ध्यानसिंगऐवजी ध्यानचंद असं म्हणू लागले.



👉 _*राष्ट्रीय हॉकी संघात निवड*_

राष्ट्रीय पातळीवरही अगदी शेवटच्या 4 मिनिटात 3 गोल करत 0-2 च्या पिछाडीवरच्या संघास विजयश्री मिळवून दिल्यामुळे त्यांना भारतीय संघातून खेळण्यासाठी निवडण्यात आले. 1926 साली न्यूझीलंड हा भारताचा पहिलाच परदेश दौरा होता. या दौऱ्यात संपूर्ण हॉकी विश्वाला चक्रावून सोडणारा अभूतपूर्व पराक्रम घडला. भारतीय सैन्यदलाच्या संघानं 21 सामन्यांपैकी 18 सामन्यांत विजय मिळवला. या दौऱ्यात भारतीय संघातर्फे 192 गोल झाले त्यातील 100 गोल एकट्या ध्यानचंद यांचे होते. यानंतर ध्यानचंद यांना शिपाई पदावरून थेट लान्स नायक पदावर बढती मिळाली.

👉 _*सुवर्णपदकाची हॅट्रिक*_

अ‍ॅमस्टरडॅम येथे 1928 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये प्रथमच हॉकीचा समावेश करण्यात आला होता. अर्थातच या स्पर्धेत भारतीय संघाला प्रवेश मिळाला होता. पहिल्याच ऑलिम्पिक लढतीत भारताने ऑस्ट्रियाला 6-0 असे नमवून तर बेल्जियम, डेन्मार्क, स्विझर्लंड या संघांवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत यजमान नेदरलँडवर 3-0 असा विजय मिळवत ध्यानचंद यांनी भारताला हॉकीतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. पाच लढतींत त्यांनी तब्बल 14 गोल केल्याने हॉकी विश्वात हॉकीतील जादूगार अशी त्यांची कीर्ती पसरली. विशेष म्हणजे संपूर्ण ऑलम्पिकमध्ये भारताविरुद्ध एकही गोल नोंदवला गेला नाही.

1932 च्या ऑलिम्पिकमध्येही भारतीय संघाने अपराजित राहत अंतिम फेरीत अमेरिकेवर 24-1 असा मोठा विजय मिळवत पुन्हा एकदा ऑलिम्पिक सुवर्णपदकाला गवसणी घातली. 1936 च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये यजमान जर्मनीविरुद्ध भारताने 8-1 असा विजय मिळवत ऑलिम्पिक सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साजरी केली. तीन ऑलिम्पिकमधील 12 लढतींत ध्यानचंद यांनी 33 गोल केले.

👉 _*हिटलरने दिली कर्नलपदाची ऑफर*_

1936 च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये यजमान जर्मनीला हरवल्यानंतर बक्षीस वितरणाला हिटलर उपस्थित होता. यावेळी हिटलरने ध्यानचंद यांना कर्नल पदाची ऑफर दिली होती. बक्षीस देताना हिटलर म्हणाला 'जर्मनीत ये, जर्मनीचं नागरिकत्व आणि सैन्यात कर्नलपद देतो तुला.'  ध्यानचंद यांनी हिटलरची ऑफर क्षणात धुडकावली ते म्हणाले 'नाही पंजाब रेजिमेन्टवर मला गर्व आहे आणि भारत भूमीचा मला अभिमान आहे.' हिटलरची ऑफर नाकारल्यानं ध्यानचंद यांचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. ज्या हिटलरसमोर उभं राहण्याची हिंमत कोणी करत नव्हतं. अशा वेळी त्याला नकार दिल्यानं ध्यानचंद यांचं कर्तृत्व उंचावलं होतं.

👉 _*ध्यानचंद यांचा सन्मान*_

अशा या महान खेळाडूचा गौरव म्हणून त्यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन भारतात राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार व द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. शिवाय खेळातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार म्हणून 2002 पासून ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो. आपल्या कारकिर्दीत खेळात असमान्य कर्तृत्व दाखविणाऱ्या आणि निवृत्तीनंतरही त्या खेळासाठी जीवन वेचणाऱ्या क्रीडापटूला ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. ध्यानचंद यांना 1956 साली पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले.

आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यांमध्ये 400 पेक्षा जास्त आणि प्रथम दर्जा हॉकी सामन्यात 1000 पेक्षाही अधिक गोल करणाऱ्या ध्यानचंद यांना वयाच्या 51 व्या वर्षी 1956 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ध्यानचंद यांचं चित्र असलेलं डाक तिकीटही सरकारनं छापलं. ऑस्ट्रियाच्या विएन्नामध्ये ध्यानचंद यांचा चारभुजाधारी पुतळा उभारण्यात आलाय ज्यात त्यांच्या चार हातात चार हॉकीस्टिक आहेत.

3 डिसेंबर 1979 रोजी कॅन्सरशी लढताना ध्यानचंद यांचं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ध्यानचंद यांच्या इच्छेनुसार त्यांचे अंतिम संस्कार स्मशाणभूमीत न करता झाशीतल्या हॉकी मैदानावर करण्यात आले. ज्याठिकाणी ते तासंनतास हॉकीचा सराव करायचे. असा हा अवलिया आजही भारतरत्न
सन्मानापासून वंचित आहे.


संकलन :-  नंदकिशोर फुटाणे