चांगले संस्कार ...
संस्कार
संस्कार मुलांवर करताना ते त्यांच्यावर ओरडून, त्यांना मारून करता येत नाहीत. संस्कार करायचे म्हणून करता येत नसतात तर ते आपल्या बोलण्यातून, वागण्यातून सहज आले पाहिजेत तरच ते मुलांच्यात खोलवर रुजले जातात. याचे एक सुंदर उदाहरण पहा.
एक मध्यमवयीन गृहस्थ आणि त्यांच्याबरोबर एक ७-८ वर्षांचा मुलगा भर दुपारी असेच फिरत होते. वाटेत त्यांना एक मोठे शेत लागले. शेतात एक शेतकरी जमीन नांगरत होता. जवळच एका झाडाखाली त्याचे जुजबी समान होते आणि झाडाच्या फांदीवर त्याने आपला सदर अडकवला होता. सदर पाहताच या छोट्या मुलाच्या मनात काहीतरी सुरु झाले आणि त्याचे डोळे चमकू लागले.
तो म्हणाला, "बाबा, त्या सदऱ्याच्या खिशामध्ये मी आता २-२ दगड ठेवतो, जेव्हा तो शेतकरी सदरा घालेल आणि खिशात हात घालून दगड पाहील तेव्हा खूप मजा येईल."
बाबा म्हणाले, "हो, पण मी एक बदल सुचवतो बघ हा....त्या दगडांच्या ऐवजी आपण २-२ चांदीचे रुपये ठेऊ या."
मुलगा म्हणाला, छे, दगडाने जास्त गम्मत येईल, रुपयांपेक्षा."
पण बाबा म्हणाले, "पहा तर, तुला जास्त मजा येईल."
मुलगा थोड्या नाराजीनेच तयार झाला आणि त्याने टाचा उंचावून त्या फांदीला लटकवलेल्या सदऱ्याच्या दोन्ही खिशात २-२ चांदीचे रुपये ठेवले. त्याला माहीत होते....मजा तर येणारच नाही उलट रुपये मात्र जाणार. ते दोघेही एका झाडाच्यामागे लपून शेतकऱ्याकडे पाहू लागले. सुर्य डोक्यावर आला शेतकऱ्याने नांगरणी थांबवून बैल सोडले आणि एका झाडाखाली त्यांना बांधले, चारा टाकला आणि स्वतःशीच पुटपुटत बांधावर बसला. आता त्याचे बोलणे या दोघानाही ऐकू येऊ लागले.
'कालच्यान अन्नाचा कण कोनाच्या पोटात गेला नाई. घरात शिजवायला कायबी नाई . कारभारीनबी उपाशीच . लेकराला दुध नाई . कसं व्हणार. काय बी समजना.' मग हताश होऊन तो उठला मडक्यातील पाणी पिला आणि फांदीवरचा सदर काढून अंगात घातला. सवयीने खिशात हात गेला. हाताला काही लागले म्हणून पाहतो तो काय चांदीचे २ रुपये!...दुसऱ्या खिशात हात घातला तर त्यामध्येही २ रुपये!!. त्याच्या चेहऱ्यावर मघापासून जी उदासीनता होती ती नाहीशी झाली त्याचा चेहरा उजळला आणि पुन्हा बोलू लागला. 'आता या पैशानं मी धान आणील आणि कारभारनीकड देईन मग ती रांधून पोटभर जेवल आणि लेकरालाबी दुध पाजलं. लेकरू मग खूप खुश होईल. त्या दोघांना असं आनंदात बघून माझबी पोट भरल.'
मग तो नांगरलेल्या शेतात गेला वरती आकाशाकडे पहात बोलू लागला, 'देवा, कोनाच्या रुपानं तू माज्यासाठी येवडा तरास घेतलास? ज्येन ह्ये काम केलं त्येला खूप आयुक्ष दे, त्यो जगाचा धर्मावतार होऊ दे, देवा, हि सारी तुजी दया...म्या आज भरून पावलो.'
हे सारे बोलणे ऐकून तो लहान मुलगा रडू लागला. आपल्याला काय होते आहे हे त्यालाच कळत नव्हते. तो त्या बाबांना म्हणाला, "बाबा,मला काय होत आहे हे मला काहीच कळत नाही. असे वाटते आहे की, माझ्या शरीराला लक्ष लक्ष डोळे फुटले आहेत आणि त्या साऱ्या डोळ्यांनी मी रडतो आहे....पण तरीही माझ्या अंगातून सुखाच्या, समाधानाच्या आणि आनंदाच्या लहरी उचंबळत आहेत."
बाबा म्हणाले."बाळ, माणुसकीचा एक धडा तू आज शिकलास. त्या गरिबाचे शब्द तू ऐकलेस ना? त्याचा आशिर्वाद देवाघरून आला आहे, तो खरा होणार."
अशी शिकवण हवी, असा गुरु हवा किंवा असा संस्कार हवा की, तो कायमचा मनांवर बिंबला जाईल. धाकधपटशा करून ...जसे की, तू असेच वागायला हवे, तसेच वागायला हवे....असे करून संस्कार होत नसतात. आपणच आपल्या आचरणातून, वागणुकीतून सहज ते प्रकट करायला हवेत आणि मुलांना जाणवून द्यायला हवेत त्यामुळेच ते सदैव त्यांच्या मनावर बिंबवले जातील......
संकलन :-नंदकिशोर फुटाणे